‘मिस इंडिया’सोबत भररस्त्यात छेडछाड, सात जण अटकेत

0
574

कोलकाता, दि. १९ (पीसीबी) – २०१० साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकलेल्या उशोशी सेनगुप्तासोबत कोलकातामध्ये भररस्त्यात छेडछाड करण्यात आली. काम संपवून रात्री पावणेबाराच्या सुमारास ती उबरने घरी जात होती. तेव्हा बाइकवरील काही तरुणांनी तिच्यासोबत छेडछाड केली व ड्राइव्हरलाही मारहाण केली. याप्रकऱणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. उशोशीने फेसबुकवर हा संपूर्ण घडलेला प्रसंग सांगितला असून तरुणांचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.

उशोशी सेनगुप्ताने लिहिलेली पोस्ट-

‘१७ जून रोजी मी माझे काम संपवून सहकाऱ्यासोबत उबेरने घरी जात होती. काही तरुण माझ्या कारच्या बाजूने जात होते आणि त्यांची बाइक कारला धडकली. माझ्या ड्राइव्हरला शिवीगाळ करत ते गाडीच्या काचांना फोडण्याचा प्रयत्न करू लागले. जवळपास १५ तरुण तिथे जमले होते. त्यांनी जेव्हा ड्राइव्हरला मारायला सुरुवात केली तेव्हा मी कारमधून उतरले व त्यांचा व्हिडिओ शूट केला. तिथून थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली. एका पोलीस अधिकाऱ्याला माझ्यासोबत येण्यास सांगितले तेव्हा त्याने तो विभाग त्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यांच्यासमोर विनवणी केल्यानंतर ते माझ्यासोबत आले व तरुणांना जाब विचारला. हल्लेखोरांनी पोलिसांना धक्का दिला व तेथून पळ काढला. त्यानंतर मला व सहकाऱ्याला घरी सोडण्याची विनंती मी ड्राइव्हरला केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवण्याचा विचार केला. पण ते तरुण माझ्या गाडीचा पाठलागच करत होते. तीन बाइकस्वारांनी माझी कार थांबवली, कारवर दगडी फेकल्या. मला कारमधून खेचून बाहेर काढले आणि माझा फोन तोडण्याचा प्रयत्न केला. कारण त्यामध्ये मी त्यांचा व्हिडिओ शूट केला होता. मी आणि माझ्या सहकाऱ्याने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोक तिथे जमा झाल्यावर तरुणांनी पुन्हा पळ काढला.’

उशोशीने लिहिलेली पोस्ट अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनाप्रसंगी पोलिसांनी योग्य वेळी योग्य ती मदत केली नसल्याची तक्रारही तिने पोस्टमध्ये केली आहे. ‘या घटनेकडे आम्ही गंभीरपणे पाहात असून सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती कोलकाता पोलिसांनी उशोशीच्या पोस्टवर दिली.