Desh

मिराबाई चानू आता मणिपूरच्या पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक

By PCB Author

July 26, 2021

इंफाळ, दि. २६ (पीसीबी) – मिराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. तिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. या कामगिरीनंतर मिराबाईवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. इतकेच काय, तिच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. तिला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचेही सांगितले होते. मिराबाई आता मणिपूरच्या पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर सरकारने मिराबाईला हे पद दिले आहे. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात वजन उचलले.

“तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही” एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला होता. “तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही,” असे मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत होते. “मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहे,” असे आश्वासन त्यांनी मिराबाईला दिले होते.