मिरवणुकीत ‘डीजे’ लावल्यास गुन्हे दाखल केले जाणार- नांगरे पाटील

0
809

कोल्हापूर, दि. २२ (पीसीबी) – सार्वजनिक विसर्जन मिरवणूकीत उच्च ध्वनियंत्रणेला परवागनी देण्याची मागणी (साउंड सिस्टीम) लोकप्रतिनिधीकडून मागणी सुरु आहे. सातारा येथेही काही जणांनी मागणी केली आहे, मात्र त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पत्रकार परिषदेत दिली. दोन बेस, दोन टॉप आणि मिक्सरलाही परवानगी दिली जाणार नाही. ही सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास जागेवरच जप्त करुन मंडळावर तत्काळ गु्न्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साउंड सिस्टीम लावण्याची भूमिका जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काय कारवाई करणार, या प्रश्नावर महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, ‘ लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना मांडण्याचे काम करतात. मात्र पोलिसांना कायद्याचे पालन करावे लागतेच. कोल्हापूर परिक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाचे चांगले प्रबोधन केले आहे. सातारा येथेही मंडळाचे प्रबोधन झाले आहे. संवेदनशील असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांची संवाद आणि समन्वय साधला आहे. सातारा येथेही मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी मंडळांनी अतिउत्साहीपणा दाखवून सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पर्यावरण संरक्षण आणि ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची ठाम भूमिका पोलिसांची राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.