“मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात?”

0
366

नागपूर, दि.२४ (पीसीबी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस आणि मी आम्ही दोघेही मित्र आहोत. मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघं मित्र आहोत. हे जगजाहीर आहे. तेही सर्वांना सांगतात, मीही सांगत असतो. मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात? असा सवाल पटोले यांनी केला. या मिठीचा राजकीय अर्थ काही होऊ शकत नाही. भाजप काँग्रेस दोन तट आहेत. कधीही एकत्र येऊ शकत नाही. दोन्ही पक्षांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते एकत्रं येऊ शकत नाही. फक्त देशहितासाठीच एकत्रं येऊ शकतात, असं पटोले म्हणाले.

आम्ही काल राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांना भेटलो. आमच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही गेलो होतो. त्यासाठी कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. वाटाघाटी हा आमचा भाग नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार काम व्हावं, त्यानुसार त्यांच्याकडे ही मागणी केली आहे, असं ते म्हणाले. काल फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी 12 सदस्यांचं निलंबन रद्द करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरून आघाडीत भांडण आहेत का? असा सवाल केला असता पटोले यांनी मीडियालाच धारेवर धरलं. माध्यम भांडण लावत आहे. आक्षेप केवळ आमचाच नाही. अजित पवारांनीही दोनच प्रभागाची मागणी केली. अनेक मंत्र्यांचं मत दोन प्रभाग ठेवण्याचं होतं. काहींचं चारचं होतं. त्यातून मध्यला मार्ग काढला गेला. आम्ही काँग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव करून मुख्यमंत्र्यांना आमची भावना कळवली आहे, असं ते म्हणाले. तसेच आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आम्ही स्वबळावरच लढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सहा जिल्ह्यातील पोटणीवडणूकीला हा अध्यादेश इफेक्ट करु शकला तर याचं स्वागत करायला हवं. राज्यपालांनी वेळेवर सही केली. चार दिवस आधी सही केली असती तर सर्वोच्च न्यायालयात हा अध्यादेश मांडता आला असता, असं ते म्हणाले.

नितीन गडकरीं विरोधात इलेक्शन पिटीशन टाकली आहे. याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. गडकरींच्या प्रतिज्ञापत्रात काही चुका असल्याचा आक्षेप आम्ही घेतला होता. आमच्या पिटीशनमध्ये तथ्य आढळ्याने, आमची त्यावर सुनावणी सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.