Pimpri

मित्राकडून वापरण्यासाठी घेतलेल्या फॉर्च्युनर कारची केली परस्पर विक्री आणि…

By PCB Author

September 13, 2021

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) : मित्राची वापरण्यासाठी घेतलेली फॉर्च्युनर कार दोघांनी परस्पर विकली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी 2020 ते 12 सप्टेंबर 2021 या कालावधीत कासारवाडी येथे घडला.

राकेश चंद्रकांत निकम (रा. कासारवाडी), प्रशांत ज्ञानोबा गायकवाड (वय 30, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत शशांक राजेंद्र घावटे (वय 30, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा मित्र सुरेश रामखिलावन यादव यांची आठ लाख रुपये किंमतीची फॉर्च्युनर कार वापरण्यासाठी घेतली होती. आरोपींनी या कारवर कर्ज काढण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून कार नेली.

त्यानंतर सुरेश रामखिलावन यादव यांच्या सहिचा, टीटी फॉर्मचा उपयोग करून कारवर कर्ज मंजूर न करता ती कार औरंगाबाद येथील कल्याण सुभाष गायके यांना परस्पर विकली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रशांत गायकवाड याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.