माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
418

भोसरी, दि.०६ (पीसीबी) – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. विवाहितेच्या व तिच्या मुलीच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांना घरातून हाकलून दिले. हा प्रकार 9 मे 2018 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत शिवगणेश नगर, धावडेवस्ती, भोसरी आणि महालक्ष्मी नगर, जेल रोड, नाशिक येथे घडला.

श्रीकांत दिलीप गायकवाड (वय 34), कलावती दिलीप गायकवाड (वय 55), दिलीप कुंडलिक गायकवाड (वय 60), हेमंत दिलीप गायकवाड (वय 34, सर्व रा. महालक्ष्मी नगर, जेल रोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 4) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणून मारहाण केली. सासूने फिर्यादीच्या लग्नापासून अंगावरील तीन तोळे सोने व त्यांच्या मुलीच्या अंगावरील सोने काढून घेतले व दोघींना घरातून हाकलून दिले. फिर्यादीच्या दिराने व सास-याने फिर्यादी यांच्या वडिलांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला ‘तू आमच्याकडे कशी नांदायला येते ते आम्ही बघतोच’ अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मुंढे तपास करीत आहेत.