माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता

0
524
पुणे, दि.१९ (पीसीबी) – माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा येथील कौन्सिल हॉल मध्ये पार पडली. शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान  असून महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.
डॉ.पांढरपट्टे म्हणाले, बदलत्या काळानुसार अधिकाऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात. कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ज्ञान ग्रहण करुन त्याचा दैनंदिन कामकाजात वापर करा, असे सांगून  डॉ. पांढरपट्टे म्हणाले, लोकराज्य मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मासिक असून प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मला लोकराज्य मासिकातील माहितीचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाची व्याप्ती पाहता विविध प्रशासकीय निर्णय गतीने घेण्यात येतील, असे सांगून विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांचे नूतनीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून यासाठी आवश्यक ते प्रशासकीय पातळीवरील निर्णय गतीने घेण्यात येतील, असे  आश्वासन डॉ. पांढरपट्टे यांनी दिले. मराठी भाषा दिन कार्यक्रम यशस्वीपणे राज्यभरात राबविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत विभाग निहाय मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षातील कामाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याला यंदा ६० वर्ष पूर्ण होणार असून यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले. तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासाठीच्या उपाययोजना, रिक्त पदभरती, वेगवान इंटरनेट सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा झाली. फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे संचालक भुपेंद्र कँथोला, समन्वयक रितेश ताकसांडे यांनी मोबाईल जर्नालिझम बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
 माहिती संचालक अजय अंबेकर यांनी प्रास्ताविकातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मागील वर्षात घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षात करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत सांगितले.  बैठकीच्या सुरुवातीला निवृत्त उपसंचालक जगदीशकुमार निर्मल, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सतिश जाधव आणि परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी विकास माळी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पुणे विभागाच्या वतीने माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. तसेच संवाद वारी, माळीण पुनर्वसन असे माहितीपट दाखवण्यात आले. मोहन राठोड यांनी आभार मानले. यावेळी संचालक व उपसंचालक यांनी नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण केले. 
औरंगाबाद (मराठवाडा) संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रशिक्षणाची किमया’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिलीप पांढरपट्टे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माहिती प्रशासन विभागाचे संचालक अजय अंबेकर,  माहिती, वृत्त व जनसंपर्क विभागाचे संचालक सुरेश वांदिले, माहिती संचालक हेमराज बागूल,  माहिती संचालक गणेश रामदासी,  विशेष कार्य विभागाचे संचालक शिवाजी मानकर तसेच राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.