मास्क वाटप प्रकरणात दीड कोटीच्या कामात ५० लाखाचा गैरव्यवहार…

0
428

पिंपरी, दि.20 (पीसीबी)-कोरोना व्हायरस या रोगाच्या काळात शहरातील गरजू झोपडपट्टी मधील गरीब नागरिकांच्या नावाचा वापर करून दीड कोटीचे मास्क खरेदी केले आणि त्यामध्ये 50 लाखाचा भ्रष्टाचार केला, असा आरोप शिवसेना पुणे जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यानी केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर याना त्या बद्दलचे निवेदन त्यानी दिले. निवेदनात त्या म्हणतात, खरेदीत करणाऱ्या प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते.

एकीकडे अनेक कंपन्या सामाजिक संस्था मंडळी, मोफत मास्क, सँनेटायझर, अन्नधान्य पुरवत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, व सत्ताधारी पदाधिकारी मात्र मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत.
महिला बचत गटांना काम दिले ती चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या नावाखाली चुकीची कामे करणे योग्य नाही.
आमच्या महिला बचत गटाने 6 रुपयेला कापडी मास्क आणि तेही चांगल्या दर्जाचे बनविले आहेत. त्याचे वाटप गरजू लोकांना केले. मास्क बनविताना शहरातील सर्व बचत गटांना आव्हान केले असते तर महानगरपालिकेचे 50 लाख रुपये वाचले असते. आपल्या राज्यात अंधेर नगरी चौपट राजा असे कामकाज चालू आहे, अशी टीका त्यानी केली.

लाईफबॉय साबण खरेदीतही असाच भ्रष्टाचार करून दुप्पट दराने खरेदी झाली आहे. हे धंदे थांबवावेत व मास्क खरेदी प्रकरणाची चौकशी करून जास्तीची रक्कम जबाबदार अधिकारी यांच्याकडून वसूल करावी, ही विनंती आहे.

अन्यथा कोरोना काळात झालेल्या सर्वच खरेदीची चौकशी साठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी करावी लागेल, असा इशारा सुलभा उबाळे यानी दिला आहे.