‘मास्क नसेल तर सामान्य माणसाला ५०० रुपये दंड. मग, महापौरांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना सूट का?’: राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

0
505

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला महापालिका प्रशासन ५०० रुपये दंड करते. महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांन एका भरगच्च कार्यक्रमात मास्क न वापरता रॅम्प वॉक केला. सामान्य माणसावर कारवाई होते तशीच आता महापौरांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारुन महापौरांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी कदम यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केली आहे.

पत्रकात सौ. कदम म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मनपा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. त्याच बरोबर कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे व वारवांर हात धुणे याबाबत जनजागृती करत आहे. तसेच शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन शहरातील सर्व सामान्य जनतेवर कडक निर्बध घातले आहे. मास्क न वापरणा-या नागरीकांना ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. लग्न, समारंभास मोजक्या नातेवाईकांसह करण्यास परवानगी दिली जात आहे. बंदिस्त सभागृहामध्ये क्षमतेपेक्षा फक्त ५० टक्केच उपस्थितांची संख्या ठेवण्याचे बंधन घालत आहे. तसेच सभागृहामध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक केले आहे. सँनिटायझरची व्यवस्था, थर्मल गन असणे अनिवार्य केले आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. एकच कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढण्यासाठी राज्य सरकार, मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे.

या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या जेष्ठ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काल आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला त्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्यासह भाजपच्या एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नाही, सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्स न पाळता सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती. या कार्यक्रमास भाजपचे प्रमूख पदाधिकारीही उपस्थित होते परंतु एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नव्हता. शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्य खरेदीमध्ये भाजपने भष्ट्राचार केला व आता कोरोना प्रसार करण्यासही भाजपचे महापौर व पदाधिकारीही जबाबदार आहेत, असे कदम यांनी म्हटले आहे.