मास्क खरेदी गैरव्यवहार चौकशीचीचे गूढ वाढले !

0
277

– राष्ट्रवादी नेते आता गप्प का , सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांचा सवाल
– वाढत्या दबावामुळे चौकशी समितीचे घोडे पुढे सरकेना

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – मास्क खरेदी घोटाळा प्रकरणात समिती नियुक्त करून दोन दिवसांनी महिना होईल, पण अद्याप पर्यंत चौकशी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणात प्रशासनाची ढिलाई असल्याचा भाजपचा आक्षेप आहे, तर भाजपचाच घोटाळा असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात लाच घेतल्याचे पुरावे दिल्यानंतर आता ती उसनवारी असल्याचे दाखवत अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सूर असल्याचे समजले. लाच देणारे घेणारे दोषी असतातच पण शासकीय सेवा नियमाप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याला अशी दोन-तीन लाखाची रक्कम उधार उसनवारीने देवघेव करता येत नाही, हे अगदी स्पष्ठ असताना पुढील कारवाईसाठी विलंब होत असल्याने संशय बळावत चालला आहे. राष्ट्रवादी आणि शिवेसनेचे काही नगरसेवक यात अडकल्याचा शोध भाजपने लावल्यामुळे विरोधकांची भुमिका मवाळ झाली असे भाजपचे नेते सांगतात. महापालिकेतील सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांनी, मास्क खरेदी प्रकरणात आरोप करणारी राष्ट्रवादी आता गप्प का, असा थेट प्रश्न केल्याने या प्रकऱणेचे गूढ आणखी वाढले आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मास्क खरेदीत सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक अडकल्याने चौकशीबाबत ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण सुरु आहे, अशी सर्सास चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या विषयात लक्ष घालण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिले होते. त्यानुसार मंगला कदम यांनी ३ जून च्या महासभेत या विषयाला वाचा फोडली. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीचा अहवाल आठ – दहा दिवसांत येणे अपेक्षित होता. प्रत्यक्षात आजही फक्त कागदपत्रे गोळा कऱण्याचेच काम सुरू आहे. चौकशी समितीवर प्रचंड दबाव येत असून चौकशीस टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्रिसदस्यीय समिती नेमून २६ दिवस उलटले तरी, चौकशीचे घोडे म्हणावे असे पुढे सरकले नाही. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवकांचे मास्क खरेदीत हात गुंतल्याने विरोधकांनीही ‘चुप्पी’ साधली आहे. मास्क खरेदीतील भ्रष्टाचारावर भाजपवर आरोप करणारे नगरसेवकही आता चौकशीचे पुढे काय झाले, याबाबत चकार शब्द काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने झोपडीधारकांना मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरव’ठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले. एक मास्क दहा रुपयांना खरेदी करण्यात आला. या महामारीतही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली. भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या संस्थाकडूनच पंधरा लाख झोपडीधारकांसाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या मास्कची खरेदी करण्यात आली. मास्कमधील भ्रष्टाचार शहरात चर्चेचा विषय झाला. मास्कचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. तसेच मास्क वाटूनही झोपडपट्टीतील कोरोना अनियंत्रित झाला. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या. फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मास्कची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (तीन) प्रवीण तुपे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आणि मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली.
त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती होऊन २६ दिवस उलटले. परंतु, अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. भाजप, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार मास्कचे काम दिले आहे. त्याचे पुरावे समोर आले आहेत. शिवसेनेच्या एका नगरसेवकाचाही हात असल्याने शिवसेना गप्प असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यात थेट भाजप पदाधिकारी आणि विरोधकही अडकल्याने चौकशीची अळिमीळी गूपचिळी सुरु आहे. चौकशी समितीवर राजकीय दबाव वाढत आहे. त्यामुळेच चौकशीला विलंब लागत असल्याचा आरोप होत आहे. चौकशीला आणखी किती दिवस लावणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महिला बचत गटाच्या नावाखाली भाजप, राष्ट्रवादी नगरसेवकांशी संबधित संस्थांनाच मास्क पुरव’याची कामे देण्यात आली. त्यासाठी भाजप आमदारांसह महापालिकेतील भाजप पदाधिकारी, नगरसेविकांच्या शिफारशी आहेत. तर, राष्ट्रवादीचे माजी महापौर, राष्ट्रवादी नगरसेविका आणि भाजप नगरसेविकांच्याही शिफारसी आहेत. त्या शिफारशी ग्राह्य धरुनच कामे दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपमधील जबाबदार पदाधिकाऱ्याचेही नाव आले आहे. कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संधी साधली. त्यांच्या शब्दाला प्रशासनाने मोठी किंमत देत त्यांच्या दोन शिफारशी ग्राह्य धरत मास्कचे काम दिल्याची माहिती मिळाली आहे.

चौकशी समितीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच स्थायी समितीची घाई करत मास्क खरेदीच्या बिलाचा विषय मंजूर केल्याने गोंधळ वाढला आहे. चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्याचे कामकाज सुरु आहे. चौकशी समितीचा निष्कर्ष येणे बाकी आहे. त्यामुळे स्थायी समितीने मास्कच्या विषयाला मान्यता देवू नये अशी विनंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली होती. तसेच, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनीही विषय मंजुरीला विरोध दर्शविला. मात्र, विरोध डावलून, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी, समितीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच स्थायी समितीने विषय मंजूर करण्याची घाई केली. १७ जूनच्या सभेत कार्योत्तर मान्यता दिली. विरोधातील राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी आपल्याही नगरसेवकांचे मास्क खरेदीत हात अडकल्याने ‘अर्थपूर्ण’ चुप्पी साधली होती. महापालिकेतील राजकीय वर्तुळात आता मास्कचा विषय आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादीलाही मोठा अडचणीचा ठरणार असे दिसते.