मास्क का नाही लावला? प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर हल्ला

0
691
बीड दि. २१ (पीसीबी) –  शहरात करोनाविषयी जनजागृतीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मापुरी रोडवरील स्थानिक सिमेंट कंपनीमध्ये करोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी काही स्थानिक पत्रकार गेले होते. करोनाविषयी काय काळजी घेत आहात, मास्क का नाही लावला? असे प्रश्न विचारल्यानंतर… प्रश्न विचारणारे तुम्ही कोण असा सवाल विचारत अज्ञात व्यक्तींनी पत्रकारांवर हल्ला चढवला. या घटनेत दत्तात्रय काळे आणि महादेव शिंदे यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
हा प्रकार घडल्यानंतर परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.