मावळ लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच ; भाजपला मावळ देणार?

0
5154

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार का?, याकडे पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये युती झालीच, तर शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार की या दोन्हींपैकी एक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघाविषयी युतीत काय तोडगा निघणार यावरच शहराचे राजकारण कोणत्या दिशेने वाहणार, हे स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघावर भाजपची मजबूत राजकीय पकड आणि खासदार शिवसेनेचा अशी स्थिती आहे. त्यामुळे युती झाल्यास मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परिणामी मावळ मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होणार असून, दोन्ही पक्षांत स्पर्धा वाढली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेनेने युती करून लोकसभा निवडणूक लढविली होती. विधानसभा निवडणुकीला ही युती तुटली. मात्र राज्यात सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले असले, तरी मने मात्र जुळलेली नाहीत. या दोन्ही पक्षांतील राजकीय संबंध एवढे ताणले गेले आहेत की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. दुसरीकडे भाजपचे नेते शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही? याकडे संपूर्ण महाराष्टाचे लक्ष लागलेले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होते किंवा नाही यावरच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये समावेश आहे. शिरूरपेक्षा मावळ मतदारसंघाभोवती शहराचे राजकारण फिरत आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये जाऊन तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुपडा साफ करून पिंपरी-चिंचवड महापालिकाही भाजपला जिंकून दिली. त्यामुळे आमदार जगताप ज्या राजकीय पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, त्या राजकीय पक्षाचे शहरात वर्चस्व निर्माण होते, असे राजकीय समीकरण बनले आहे.

आता जगताप हे गेल्या लोकसभा निवडणुकीला झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे युती करण्याची गाडी पुढे सरकल्यास शिवसेना मावळ मतदारसंघ भाजपसाठी सोडणार का? हा मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघावर भाजपची मजबूत राजकीय पकड आहे, हे वास्तव आहे. खासदार शिवसेनेचा असला तरी मतदारसंघात पक्षाची वाईट अवस्था आहे, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे शिरूर आणि मावळ या दोन्हींपैकी मावळ मतदारसंघ मिळावा, अशी भाजपची आग्रही मागणी असणार आहे. परिणामी मावळ मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होणार असून, दोन्ही पक्षांत स्पर्धा वाढली आहे.