Pune Gramin

मावळ येथील वेहेरगाव व चांदखेड मध्ये दोघे निघाले कोरोना ‘पॉझिटीव्ह’!

By PCB Author

May 21, 2020

मळवली, दि.२१ (पीसीबी) – मावळात आज सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वेहेरगावमध्ये वास्तव्याला असलेल्या २८ वर्षीय तरुणाच्या तसेच चांदखेड येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आज (गुरुवारी) दिली.

वेहेरगाव व दहिवली कन्टेनमेंट झोन

कोरोना रुग्ण आढळल्यामुळे वेहेरगाव व दहिवली कन्टेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी आज काढले. वेहेरगावपासून पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रातील देवघर, जेवरेवाडी व करंडोली ही गावे बफर झोनमध्ये राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

वेहेरगाव येथे काल बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणाला त्रास होऊ लागल्याने औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (गुरूवारी) प्राप्त झाला असून त्यात ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती व्यक्ती हाॅटेल कामगार आहे असे समजते.

त्यानंतर त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील तीन व्यक्तींना आज (गुरूवारी) दुपारी पुण्याच्या ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.