मावळमधून श्रीरंग बारणे, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

0
781

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (दि. २२) जाहीर केली. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे आणि शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विरूद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगणार हे निश्चित झाले आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघाचे उमेदवारही जाहीर केले जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने अपवाद वगळता बहुतांश मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिवसेनेनेही शुक्रवारी दुपारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार विरूद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विरूद्ध शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना होईल. या दोन्ही मतदारसंघात कोण बाजी मारणार हे २३ मे रोजी कळणार आहे.