मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आता शिवसैनिकांचाच विरोध; मावळ तालुका शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना पत्र

0
874

पिंपरी, दि. १५  (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आता शिवसेनेतूनच मोठा विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत येत बारणे यांनी खासदार झाल्यानंतर मावळमधील शिवसैनिकांवरच सूड उगवले आहेत. आपल्या पदाचा वेळोवेळी गैरवापर करत पक्षाला दगाफटका करणाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना चालवत आहेत. बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास पक्षाला मावळमध्ये दगाफटका होऊन पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिवसेनेने बारणे यांच्याऐवजी योग्य उमेदवाराचा विचार करावा, अशी मागणी मावळ शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे बारणे “डेंजर झोन”मध्ये असून, आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजपने आधीच विरोध केला. बारणे हे सक्षम उमेदवार नसून, ते खासदार झाल्यानंतर शिवसेनेला संपूर्ण मतदारसंघात सगळीकडे पराभव पाहावा लागला आहे. आता लोकसभा निवडणुकीतही बारणे यांचा पराभव झाल्यास शिवसेनेसोबत भाजपलाही त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. तसे होऊ नये म्हणून शिवसेनेने बारणे यांच्याऐवजी निवडून येणारा सक्षम उमेदवार द्यावा, मागणी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आता शिवसेनेतूनही श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी बारणे यांनी थेरगावमध्ये शिवसेनेची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे एकही नगरसेवक उपस्थित राहिला नसल्याचे समजते. अशा परिस्थितीत आता मावळ तालुका शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बारणे यांच्या कार्यपद्धतीचा पाढाच वाचला आहे. तसेच बारणे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणीच या पत्रात केली आहे.

उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले श्रीरंग बारणे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या बळावर चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. आपला आदेश असल्याने शिवसैनिकांनी बारणे यांचे काम केले. खासदार झाल्यानंतर बारणे यांचा शिवसैनिकांकडून प्रत्येक ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला. पण त्यानंतर बारणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सच्च्या शिवसैनिकांवर सूड उगवण्याचे काम केले. सच्च्या शिवसैनिकांना गाडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. बारणे यांनी शिवसेनेने दिलेल्या पदाचा गैरवापर करत पक्षाला वेळोवेळी दगाफटका दिलेल्या आणि बंडखोरांना विविध पदावर बसविले आहे. त्यांच्या माध्यमातून ते मावळमध्ये शिवसेना चालवत आहेत.

बारणे यांच्या मनमानी कारभारामुळे लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. तसेच अवघे सहा नगरसेवक निवडून आले. बारणे यांनी मनमानी केली नसती, तर शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून आले असते. खासदार बारणे हे शिवसेनेत ज्या पक्षातून आले, त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मदत करत होते. लोणावळा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निष्ठावान शिवसैनिकाला डावलून बारणे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला या पदावर बसवले. त्यावरून त्यांनी शिवसेनेऐवजी काँग्रेस वाढवण्याचे काम केले हे स्पष्ट होते. याबाबत आपणाकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत आपण स्वतः मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्या पदाला स्थगिती दिली.

तसेच पक्षाच्या सहा नगरसेवकांवर कारवाईचे आदेश दिले. परंतु, खासदार बारणे यांनी तुमचा आदेश देखील धुडकावून राजू खांडभोर यांना तालुकाप्रमुखपद पुन्हा दिले. नगरसेवकांवर देखील काहीच कारवाई केली नाही. बारणे यांच्या अशा मनमानी कारभारामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत दुफळी माजली आहे. गट-तट कधीच नसलेल्या मावळ शिवसेनेत खासदार बारणे यांनी गटातटाचे राजकारण सुरू केले. त्यामुळे पक्षात सगळीकडे बारणे यांच्याविषयी नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास निवडणुकीत पक्षाला दगाफटका बसेल. शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागेल. मावळमधील तमाम शिवसैनिकांचा खरी व्यथा पाहता मावळ मतदारसंघात उमेदवारीबाबत पक्षाने एकदा गंभीरपणे विचार करावा. बारणे यांच्याऐवजी दुसरी कोणीही उमेदवार दिल्यास आम्ही सर्व शिवसैनिक पक्षाचे निष्ठेने काम करू. मावळ मतदारसंघात बारणे यांना उमेदवारी न देता योग्य उमेदवाराचा विचार करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.”