मावळ मतदारसंघात शिवसेनेत अस्वस्थता आणि शिरूरमध्ये उत्सुकता; युतीचे घोडे अडल्याने पिंपरी-चिंचवडचे राजकारण संभ्रमावस्थेत

0
1645

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – युती झाली आणि मावळ मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे पुन्हा उमेदवार असतील, तर आम्ही काम करणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपच्या जुन्या निष्ठावन पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या या गुगलीने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने असा पवित्रा न घेतल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून मैदानात कोण उतरणार याबाबत मात्र शिवसेनेसोबतच शिरूर मतदारसंघातील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच युतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काहीशी अस्थिर व संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराने खासदारकी वगळता १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची पाठ सोडलेली नाही. आमदारकीला आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीलाच विजयी केलेले आहे. आमदार अजितदादा पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही शहराने भरभरून प्रेम केले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मात्र शहराने राष्ट्रवादीला कधीच साथ दिलेली नाही. सध्या राष्ट्रवादीसोबतच शिवसेना आणि भाजपनेही लोकसभेसाटी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत पिंपरी-चिंचवडचा मावळ आणि शिरूर यो दोन लोकसभा मतदारसंघात समावेश झाला. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. दोन्ही मतदारसंघ सलग दोन टर्म शिवसेनेने जिंकले आहेत. दोन्ही वेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्याचा फायदा शिवसेनेला झाला.

आताही भाजप-शिवसेनेची युतीबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद प्रथम क्रमांकाची असल्याने हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी स्थानिक पदाधिकारी करत आहेत. तसे झाले नाही आणि युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली, तर आम्ही काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याला बारणे यांचे गेल्या साडेचार वर्षातले राजकारण कारणीभूत ठरले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी भाजप आणि भाजपच्या नेतृत्वार आरोप करून स्थानिक पदाधिकाऱ्यांना अंगावर घेणे आता बारणे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. “आ बैल मुझे मार”, या हिंदीतील म्हणीप्रमाणे वागण्याचा बारणे यांना आताच्या निवडणुकीत राजकीय फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मावळ मतदारसंघात बारणे यांचे काम करणार नसल्याचे सांगत भाजपने टाकलेल्या गुगलीने शिवसेना घायाळ झाली आहे. मावळमध्ये पॉवरफुल राजकीय कुटुंबातील पार्थ पवार यांच्यासारखा उमेदवार प्रतिस्पर्धी असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचे काम न करण्याची टाकलेली गुगली शिवसेनेची चिंता वाढवणारी आहे. निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेची वाट बिकट होण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. युती झाली तर शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार हे निश्चित आहे. शिवसेनेकडून तीनदा खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील हेच चौथ्यांदा निवडणूक लढवणार हे सुद्धा निश्चित आहे. त्यामुळे शिरूरमध्ये शिवसेनेचा विजय सोपा होणार आहे.

परंतु, मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असताना शिरूरमध्ये मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि शिरूर तालुक्यातील चंदन सोंडेकर यांच्यापैकी राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. हे दोघेही निवडणुकीच्या तयारीला लागले असले, तरी पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आताच्या राजकारणात उमेदवारीबाबतचा सस्पेन्स राजकीय पक्षांना परवडणारा नसतो. तरीही राष्ट्रवादीने शिरूर मतदारसंघात हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळेच मावळ मतदारसंघात शिवसेनेत अस्वस्थता आणि शिरूरमध्ये उत्सुकता, अशी परिस्थिती आणि युतीचे काय होणार याचे चित्र स्पष्ट होत नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काहीशी अस्थिरता आणि संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.