मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पोरखेळ; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरचा अविश्वास आणि बिनडोक प्रचार पडला महागात

0
1148

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात स्वतः अजितदादांनी आपल्या मुलाला मैदानात उतरवून निवडणुकीत रंगत आणली. परंतु, प्रचार यंत्रणा राबवण्यात आलेले अपयश, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच ज्याच्या मनात येईतल तसा केलेला प्रचार, प्रचाराच्या सुरूवातीपासूनच कार्यकर्त्यांना आर्थिक रसद पुरवण्यात आलेले अपयश, मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आणलेल्या यंत्रणेवर दाखवलेला अधिकचा विश्वास, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विश्वासपूर्ण समन्वयाचा अभाव, उमेदवार पार्थ पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या भोवतीच घुटमळणाऱ्या चांडाळ चौकडीला कार्यकर्त्यांना घालावा लागत असलेला सलाम तसेच प्रचार करताना माध्यमांना केलेले बेदखल आणि सोशल मीडियावरच्या बिनडोक प्रचारामुळे अजितदादांनी मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाच्या खायीत लोटले.

अजितदादांनी पिंपरी-चिंचवडला आपला राजकीय बालेकिल्ला बनवला होता. परंतु, त्यांचे राजकीय डावपेच त्यांच्यावरच उलटले आणि पाच वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागले. अनेक विश्वासू शिलेदार सोडून गेल्याने विधानसभेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकाही अजितदादांच्या ताब्यातून गेली. परंतु, शहरात काम केलेले असल्याने पाच वर्षानंतर शहरातील नागरिकांचे मतपरिवर्तन झाले असेल. शहरातील नागरिक पुन्हा आपणाला स्वीकारतील या अपेक्षेने अजितदादांनी थेट लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलालाच उतरवले. मावळ मतदारसंघातून मुलगा पार्थ पवार याला राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांनी मिळवून दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण मावळ मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

शरद पवारांची तिसरी पिढी आणि अजितदादांचा मुलगा म्हटल्यानंतर मावळ मतदारसंघात राजकीय वातावरण एकदम टाईट झाले. पार्थ पवार यांच्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली प्रचार सभा झाली. या सभेत भाषण करताना पार्थ पवार यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. चार वाक्य वाचूनही भाषण करता येत नसल्याने पार्थ पवार सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. परंतु, नंतर त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जात मतदारांमध्ये स्वतःबाबत एक सहानुभूती निर्माण केली. नागरिकांच्या टिकेकडे जास्त लक्ष न देता प्रचारावर भर देत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या आप्तेष्ट मित्रमंडळींसह मोठी यंत्रणा मावळ मतदारसंघात ठाण मांडून होती.

संपूर्ण मावळ मतदारसंघात कायम दोन गटाने काम करणारी राष्ट्रवादी मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक झाली. सर्वांनी एकदिलाने काम करण्यास सुरूवात केली. परंतु, जसजसा प्रचार पुढे जाऊ लागला, तसतसा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली. अजितदादा आणि त्यांच्या टिमने प्रचारासाठी बाहेरून आणलेली यंत्रणा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरली. कोण काय प्रचार करतोय याचा कोणाला काहीच पत्ता नसायचा. उमेदवार पार्थ पवार शहराच्या कोणत्याही भागात प्रचार करतात, याचा पक्षाच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना थांगपत्ताच नसायचा. प्रचार करून गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी आले होते, याची माहिती मिळत असे.

पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून शहरातील एका चांडाळ चौकडीने त्यांच्या अवतीभवती कायम गराडा घातला. या चांडाळ चौकडीला सलाम घालणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाच पार्थ पवार यांना भेटण्याची संधी मिळायची. त्यामुळे देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीला सुरूवात झाली. तसेच प्रचाराच्या सुरूवातीपासून कार्यकर्त्यांना आर्थिक रसद पुरवण्यात आली नव्हती. पक्षाने तुम्हाला किती तरी कमवून दिले आहे. आता तुम्ही आमच्यासाठी खर्च करा, असा आदेशच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना होता. परिणामी नगरसेवक व पदाधिकारी हातचे राखूनच प्रचार करत होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काही भागात आर्थिक रसद पुरवण्यात आली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीने सोशल मीडियावर पार्थ पवार यांचा बिनडोक प्रचार केला. कोणत्याही मुद्द्यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया टिमचा खटाटोप लोकांच्या लक्षात आला. पार्थ पवार यांनी लोकलने उलटा केलेला प्रवास आणि वाहतूककोंडीमुळे सभेचे ठिकाण गाठण्यासाठी रस्त्यावरून धावतानाचा व्हीडिओ पोस्ट करून राष्ट्रवादीने स्वतःचेच हसू करून घेतले. पार्थ पवार यांच्या प्रचार यंत्रणेपासून माध्यमांना दूर ठेवणे देखील राष्ट्रवादीला माहागात पडले. प्रचाराच्या सुरूवातीला पार्थ पवार यांची प्रसिद्धीची सुसाट सुटलेली गाडी निवडणूक आयोगाने पेड न्यूजबाबत नोटिस पाठवल्यानंतर एकदमच बंद पडली. त्यानंतर पार्थ पवार कोणत्या भागात प्रचार करतात, कोठे सभा झाली, पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी कोठे सभा घेतली याची काहीच माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही. त्यामुळे पार्थ पवार उमेदवार आहेत का?, हेच मतदारांपर्यंत पोहोचत नव्हते. एकंदरीत काय तर अजितदादांनी ढिसाळ प्रचार नियोजन करून स्वतःच्या मुलाला तसेच राष्ट्रवादीला पराभवाच्या खायीत लोटले.