मावळ मतदारसंघातून मुलाच्या उमेदवारीबाबत अजितदादांनी स्पष्टपणे बोलणे टाळले  

0
1184

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार  मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अजित पवारांना छेडले असता त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले.  पार्थच्या राजकारण प्रवेशावर त्यांनी कोणतेही थेट उत्तर  न देता आपल्याला माहित नाही, असे सांगून लोकशाही आहे, लोक काय म्हणतात ते पाहू, असे सुचक उत्तर दिले.      

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर   असल्याची महिती सूत्रांकडून समजत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे खासदार  श्रीरंग बारणे  प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. नार्वेकर १ लाख ८२ हजार २९३ मते घेत तिसऱ्या स्थानावर फेकले होते. शिवसेनेच्या बारणेंना ५ लाख १२ हजार २२३ मते मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावरील शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप यांनी ३ लाख ५४ हजार ८२९ मते घेतली होती.