मावळ क्राईम… पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

0
755

देहूरोड, दि. ३० (पीसीबी) – बेकायदेशीरपणे, विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 28) दुपारी देहूरोड येथे करण्यात आली.

अमोल अशोक कालेकर (वय 25, रा. पवनानगर, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक दादासाहेब जगताप यांनी रविवारी (दि. 29) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कालेकर हा पिस्टल घेऊन देहूरोड येथे येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून कालेकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

कालेकर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात जानेवारी 2019 मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.