मावळ आणि शिरूर लोकसभेच्या निर्णयात लक्ष्मण जगताप अन् महेश लांडगे यांनाच महत्त्व

0
4236

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही खासदार गतीने जनसंपर्क आणि राजकीय गोळाबेरीज करण्यात व्यग्र आहेत. शिवसेनेच्या या दोन्ही खासदारांनी गणेशोत्सवात गणपतीची आरती, बैठका आणि दौरे केले. त्यामुळे आता हळूहळू सोशल मीडिया आणि अन्य बातम्यांतून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. ही सर्व तयारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार या गृहीतकावर आधारित आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार झालेल्या या दोन्ही विद्यमान खासदारांना यंदा आपले प्रगती पुस्तक घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. हीच त्यांची मोठी राजकीय परीक्षा आहे. असे असले तरी मावळ मतदारसंघाच्या निर्णयात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि शिरूर मतदारसंघाच्या निर्णयात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाच महत्त्व असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहेत. मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे, तर शिरूरमध्ये सलग तिसऱ्यांदा शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु, लोकसभेतील विजयानंतर या दोन्ही मतदारसंघांच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची धुळधाण उडाली आहे. भाजपने २०१४ आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका केडरबेस केल्या आहेत. भाजपमुळे गेल्या साडेचार वर्षांत विरोधकांनाही निवडणुकांना सामोरे जाताना होमवर्क करण्याची सवय जडली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आणि त्या त्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपापले वॉररूमवर काम सुरू केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती झाली तरी दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक स्थिती लक्षात घेता त्याचा उपयोग अनिश्चित आहे. शिरूर मतदारसंघात चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे तयारीला लागले आहेत. त्यांचा जनसंपर्क व प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न गांभीर्याने सुरू आहेत. खरी समस्या मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना स्वपक्षातूनच होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व माजी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनीच बारणे यांना अपशकुन केला आहे.

दोन्ही विद्यमान खासदारांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार या गृहीतकावर आधारित सर्व तयारी सुरू केली आहे. युती झाल्यास स्वपक्षातील विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असा दोन्ही खासदारांचा पक्का समज आहे. परंतु, मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे या दोन गटात राजकारण केंद्रित आहे. या दोन्ही मतदारसंघात जगताप आणि लांडगे यांची भूमिका निर्णायक आहे. मावळ मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निर्णय प्रक्रियेवर आमदार जगताप यांचा निश्चितच प्रभाव असेल.

मावळ आणि शिरूरमध्ये ही राजकीय वस्तुस्थिती असताना आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातही सारे काही आलबेल नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यास जगताप-बारणे आणि लांडगे-आढळराव पाटील यांच्यातील राजकीय भांडणाचे काय निराकरण होते, यावरच निवडणुकीचे गणित ठरेल. आगामी निवडणुकीची हवा तापू लागल्यामुळे भाजपने निर्माण केलेले राजकीय आव्हान शिवसेनेच्या दोन्ही प्रस्थापित खासदारांना सोपे मात्र नक्कीच नाही.