Banner News

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काउंटडाऊन सुरू…उरले अवघे आठ दिवस

By PCB Author

April 20, 2019

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघील सर्वच उमेदवारांकडून नेत्यांची बेरीज-वजाबाकी, कार्यकर्त्यांची दलबदली, रुसवे-फुगवे काढणे आणि मतदारसंघातील सर्व प्रमुख गावांमध्ये पोहोचणे, हा निवडणुकीतील पहिला फेर आता संपला. काही इनकमिंग-आउटगोइंग मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील. मात्र आता पटावरील चित्र बऱ्यापैकी सुस्पष्ट व्हायला लागले आहे. कुणाचे प्यादे कुठे आहेत, कोण वजीर असेल, कुणाचा उंट कुणाला शह देईल, याची उभी-आडवी मांडणी आता नजरेसमोर यायला लागली आहे.

प्रचारासाठी आता अवघे आठ दिवस उरले आहेत. मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील ५० लाखांहून अधिक मतदारांच्या मन, मेंदू आणि मत परिवर्तनाचे डावपेच रंगतदार होणार आहेत. त्यासाठी नेत्यांच्या फौजा मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीचा हा शेवटचा आठवडा एप्रिल हीटपेक्षाही अधिक तापणार आहे. राजकीय खेळ गतीमान होणार आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होईल. या दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा लक्ष वेधत आहे. प्रमुख उमेदवारांनी सभा, मेळावा, रॅली आणि बैठकांना वेग दिला आहे. त्या त्या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रांचा धडाका लावला आहे. दिल्लीचे तख्त राखण्यासाठी अगदी गल्लीबोळात देखील बैठका आयोजित केल्या जात आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणांवर आधारित नवे चित्र समोर येत असताना तोच धागा पकडून नेत्यांकडून उसवलेले शिवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांकडून जुळण्या आता झाल्या आहेत. नेत्यांची जुळवाजुळव संपली आहे. आता शेवटच्या आठ दिवसांत लोकांची जुळवाजुळव महत्वाची ठरणार आहे.