मावळ आणि शिरूर मतदारसंघात तीन फ्रेश तरूण चेहरे चर्चेत; पार्थ पवार, बाबाराजे देशमुख आणि चंदन सोंडेकर

0
4719

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक नावे चर्चेत आहेत. परंतु, चर्चा होणाऱ्या या नावांमध्ये तीन नवीन फ्रेश चेहऱ्यांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि मावळ तालुक्यातील बाबाराजे देशमुख या दोन तरूणांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंदन सोंडेकर हा तरूण चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या तिघांपैकी कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार आणि तरूण खासदार म्हणून निवडून येणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. अनेकजण इच्छुक असले तरी युती आणि आघाडीचे काय होणार यावरच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. आघाडीच्या जागा वाटपात दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार हे निश्चित आहे. परंतु, युती झाल्यास मावळ आणि शिरूर या दोन्हीपैकी एक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे युतीवरच मावळ आणि शिरूरमध्ये कोणाचा विजय होऊ शकतो, हे ठरणार आहे.

या दोन्ही मतदारसंघाची ही सध्याची राजकीय परिस्थिती असली, तरी हे दोन्ही मतदारसंघ निवडणुकीच्या आधीच एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. या दोन्ही मतदारसंघातील तीन नवीन फ्रेश तरूण इच्छुक चेहरे पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. मावळ मतदारसंघातून खुद्द अजितदादांचे पुत्र पार्थ पवार तयारीला लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून मावळ तालुक्यातील तरूण चेहरा बाबाराजे देशमुख हे सुद्धा निवडणुकीची तयारी करत आहेत. सकल मराठा आंदोलनात सर्वांचे लक्ष वेधून घेणारे बाबाराजे देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरणार आहेत.

सर्व राजकीय पक्ष फक्त जनतेची दिशाभूल करतात म्हणून आपण मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. बाबाराजे देशमुख हे तरूणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. ते अपक्ष लढल्यास चांगली मते घेतील पण विजयापर्यंत जाणे अवघड आहे. परंतु, त्यांना पडणाऱ्या मतांचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मावळ मतदारसंघातील पार्थ पवार आणि बाबाराजे देशमुख या दोन तरूण चेहऱ्यांसोबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील चंदन सोंडेकर हा तरूण चेहरा सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चंदन सोंडेकर हे शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

उमेदवारी मिळत असताना देखील शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते घरात बसलेले असताना चंदन सोंडेकर या तरूणाने खासदार व्हायचेच या इराद्याने संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रचाराची पक्ष पातळीवर देखील घेतली गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात अनेकजण इच्छुक असताना पार्थ पवार, बाबाराजे देशमुख आणि चंदन सोंडेकर या तीन नवीन चेहऱ्यांची सध्या जास्त चर्चा आहे. या तिघांपैकी कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार आणि तरूण खासदार म्हणून मैदान मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.