मावळ आणि शिरूर मतदारसंघात प्रचारासाठी १५ दिवस; राजकीय डावपेचांसाठी एक महिन्यांहून अधिकचा वेळ

0
732

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात चार टप्प्यात पार पडणार आहे. ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार तारखांना मतदान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असणाऱ्या मावळ आणि शिरूर मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होईल. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना अर्ज माघारी घेतल्याच्या दिवसांपासून प्रचारासाठी एकूण १५ दिवस मिळणार आहेत. त्याचप्रमाणे चौथा टप्पा असल्यामुळे उमेदवारांना व त्यांच्या पडद्यामागील सूत्रधारांना राजकीय डावपेच खेळण्यासाठी एक महिन्यांहून अधिक काळ मिळणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी १७ मार्च रोजी तारखा जाहीर केल्या. याच दिवसांपासून देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाने ११ ते १९ मे या काळात एकूण सात टप्प्यांत मतदान घेण्याचे घोषित केले आहे. महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार तारखांना म्हणजेच चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी विदर्भातील तीन आणि मराठवाड्यातील सात मतदारसंघात तसेच तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील आठ, खाणदेशातील दोन, मराठवाड्यातील दोन आणि कोकणातील दोन मतदारसंघात मतदान होईल.

त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मुंबई, खाणदेश आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील एकूण १७ मतदारसंघात मतदान होईल. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजीच मतदान होणार आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघात लढू इच्छिणाऱ्यांना २ ते ९ एप्रिल यादरम्यान आपले उमेदवारी अर्ज सादर करता येतील. १० एप्रिल रोजी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर उमेदवारांना १२ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

त्यानंतर प्रचाराचा खरा रणसंग्राम सुरू होईल. मावळ आणि शिरूरसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी एकूण १५ दिवसांचा अवधी मिळणार आहे. उमेदवारांना मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे २७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करता येईल. या दोन्ही मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांना व पडद्यामागील सूत्रधारांना राजकीय डावपेच खेळण्यासाठी एक महिन्यांहून अधिकचा काळ मिळणार आहे.