मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप ३ नोव्हेंबरला रणशिंग फुंकणार; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्राधिकरणात होणार सभा

0
4419

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप ३ नोव्हेंबर रोजी रणशिंग फुंकणार आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी भाजपची सभा होणार आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने भाजपची महाराष्ट्रातील पहिली सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. शिवसेनेसोबत युती न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात स्वतंत्र लढण्याची भाजपची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातही भाजप स्वतंत्र लढण्यास सज्ज आहे. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. २६) बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही मतदारसंघातील संघटनेचा आढावा घेतला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, महेश लांडगे, बाबुराव पाचर्णे, प्रशांत ठाकूर, विजय काळे, सुरेश हाळवणकर, खासदार अमर साबळे, संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह दोन्ही मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या संघटनात्मक आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ३ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर सभा घेण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी होणारी ही पहिलीच सभा असल्याने एक लाखांहून अधिक नागरिक सभेला उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जे पिकते ते राज्यभर खपते. त्यातून राज्यभर राजकीय हवा तयार होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. ही अपेक्षा पूर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्यानुसार प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपही रणशिंग फुंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.