मावळातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार: लोणावळा व मावळच्या…

0
422

लोणावळा, दि.२५ (पीसीबी) : आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पुणे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मावळ, लोणावळा व परिसरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर प्रत्यक्ष भेटी देऊन बुधवारी (दि.24) पाहणी केली. यावेळी राजमाची गार्डन, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आदी ठिकाणांवर जाऊन पर्यटन स्थळांवरील स्थानिक समस्यांबरोबरच येथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या मावळ तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण होत आहे. मावळ तालुक्याची ओळख पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तालुक्यातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी स्थानिकांना निर्माण होऊ लागल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा, मनोरंजन, विरंगुळा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे असून या अनुषंगाने मावळातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.

मावळात येणाऱ्या पर्यटकांचा जास्तीत जास्त वेळ पर्यटन स्थळांवर व्यतित व्हावा व याचा फायदा पर्यटनावर आधारित असणाऱ्या छोट्या स्थानिक व्यावसायिकांना व्हावा. पर्यटकांसाठी निसर्ग पर्यटनासोबतच झीप लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रोप वे असे साहसी प्रकल्प राबविण्यात यावे. राज्य सरकारने राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. या साहसी पर्यटन धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.

पर्यटन स्थळांचा विकास करत असताना वनविभागाचे सहकार्य गरजेचे आहे. वनविभागाच्या हद्दीतील काही ठिकाणी नियम, परवानग्या यांमुळे असे प्रकल्प राबविताना अडचणी येतात. त्यासाठी अधिकाऱ्यांनी या प्रक्रिया सुलभ करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनस्थळांच्या जवळ वाहनतळासाठी जागा उपलब्ध झाल्यास सुट्टयांच्या काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. पर्यटकांना रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे, वाहनतळ यांसारख्या मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. ही पर्यटनस्थळे आता फक्त सेल्फी पॉइंटसाठी न राहता याठिकाणी वॉटर लाईट शो, लहान मुलांसाठी खेळणी, म्युझिकल रेन डान्स इ. प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. भविष्यातील पर्यटन विचारात घेता असे विविध प्रकल्प याठिकाणी राबवावे लागतील. पर्यटन वाढ झाल्यास त्याचा फायदा स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक, टपरीधारक, हॉटेल्स यांना नक्कीच होईल. असा पर्यटन स्थळांच्या विकासाचा प्रस्ताव आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला.

या पर्यटनस्थळांवरील पाहणी करत असताना स्थानिक व्यवसायिकांसोबत देखील जिल्हाधिकारी देशमुख व आमदार सुनिल शेळके यांनी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती समजून घेतल्यानंतर यावर लवकरच योग्य मार्ग काढून विकासकामांची सुरुवात करण्यात येईल. पर्यटन वाढीच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नक्कीच सहकार्य केले जाईल असे आश्वासन देखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, सुशिल मंतावार, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड,अनिल मालपोटे, मयुर झोडगे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.