मावळमध्ये श्रीरंग बारणे २ लाख १५ हजार ९१३ मतांनी विजयी; अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांचा दारूण पराभव

0
795

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा दुसऱ्यांदा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला. श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते, तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ मते पडली. तसेच १५ हजार ७७९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, कर्जत, पनवेल या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार होते. त्यातील १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले होते. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात गुरूवारी मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्या पार पडल्या. सुरूवातीला सकाळी आठ वाजता टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली.

सकाळी ९ च्या सुमारास मतदान यंत्रांतील मतमोजणीला सुरूवात झाली. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर सुरूवातीपासून घेतलेली आघाडी विजय होईपर्यंत कायम ठेवली. १३ लाख ६६ हजार ८१८ मतदानांपैकी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली. त्यामुळे श्रीरंग बारणे यांचा २ लाख १५ हजार ९१३ मतांनी विजय मिळवला.

या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील ७५ हजार ९०४ मते पडली. त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अॅड. संजय कानडे यांना १० हजार १९७ मते पडली. याशिवाय १५ हजार ७७९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.