Pune Gramin

मावळमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराला ‘मनसे’चा पाठिंबा!

By PCB Author

October 13, 2019

मावळ, दि.१३ (पीसीबी) – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी दिली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजताच सुनील शेळके यांनी प्रचार सुरू केला होता. मात्र, भाजपामधून त्यांच्या ऐवजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे ते नाराज झाले होते. अपक्ष निवडणूक लढवणार अशी दाट शक्यता असताना शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे मावळमधील लढत अधिक रंगतदार झाली असून आता मावळ मनसेने देखील सुनील शेळके यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुनिल शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुनिल शेळके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. हा पाठिंबा बिनशर्त आहे, हेच महत्त्वाचे आहे असं नमूद करून ते म्हणाले, मनसेला सोबत घेऊन काम करताना आमची ताकद दुपटीने वाढणार आहे. यापुढे मनसेबरोबर विचार विनिमय करूनच तालुक्यासंदर्भात निर्णय घेतले जातील असेही शेळके यांनी स्पष्ट केले.