मावळमध्ये पार्थ पवार, तर बारामतीत सुप्रिया सुळे विजयी होणार; एबीपी माझाच्या एक्झिट पोलचा अंदाज

0
818

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पार्थ पवार, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे विजयी होतील, अशी शक्यता एबीपी माझाच्या एक्झिट पोलने वर्तविली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजितदादांचे पुत्र आहेत. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा विजय झाल्यास तो शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का असेल.

मावळ लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी, तर बारामती लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जाणते राजे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने राजकीय टिळा लावला आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राष्ट्रवादीकडून मैदानात होत्या. सुप्रिया सुळे यांना भाजपच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. कांचन कुल या दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी (दि. २३) लागणार आहे. या निकालात मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल काय असणार आणि पवार कुटुंबाचे काय होणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा म्हणजे सातवा टप्पा पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार, तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघातील निकाल हा शिवसेनेसाठी, तर बारामती लोकसभा मतदारसंघातील निकाल हा भाजपसाठी राजकीय धक्का देणारा ठरणार आहे. विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची राजकीय कोंडी होणार आहे. अर्थात एबीपी माझाचा मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल खरा ठरतो का?, हे दोन दिवसांनंतर स्पष्ट होईल.