Pune Gramin

मावळमध्ये डान्सबारमधील वाद सोडविताना पोलीस उपनिरीक्षक गोळीबारात जखमी  

By PCB Author

March 09, 2019

लोणावळा, दि. ९ (पीसीबी) – मावळमधील  एका  डान्सबारमध्ये दोन गटात झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरिक्षकांवर गोळी झाडण्यात आली.  यामध्ये ते  जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल देण्यावरून दोन गटात वाद झाला. एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आला. हा वाद सोडविण्यासाठी  पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहिते गेले. त्यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात  त्यांच्या पायावर  गोळी  लागली.  त्यांना खासगी रुग्णालयात  दाखल केले आहे.

याप्रकरणी  २ आरोपींना पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वडगाव मावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.  बंदी उठवल्याने डान्सबार पुन्हा सुरू झाले आहेत. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकांवर गोळीबार करण्यात आल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होऊ लागली आहे.