Banner News

मावळमधून लोकसभेसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित

By PCB Author

January 28, 2019

मुंबई,  दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार  मावळ लोकसभा मतदारसंघातून  रिंगणात उतरणार असल्याचे  निश्चित मानले जात आहे.  पार्थ यांच्या उमेदवारीवर    लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय  सूत्रांकडून मिळत आहे.

मावळमधून  पार्थ यांना उमेदवारी मिळवण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नव्हती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या उमेदवारीस शरद पवार अनुकूल भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही दिवसापासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते हजेरी लावत आहेत. तसेच त्यांनी मावळात आपला संपर्क वाढविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या पोस्टरवर  पार्थ पवार यांचे छायाचित्र दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी  लोकसभा निवडणुकीत  पार्थ पवार रिंगणात उतरणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.