मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे १०० कोटींचे मालक; दत्तक गावात विकासाच्या नावाने ठणठण गोपाळ?

0
778

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची एकूण संपत्ती १०२ कोटी पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. कोट्यधीश बारणे यांनी खोपटे हे गाव दत्तक घेतले आहे. हे दत्तक गाव त्यांना स्वतःच्या खर्चाने सुद्धा सुजलाम् सुफलाम् करता आले असते. प्रत्यक्षात बारणे यांनी दत्तक गावाचा काय कायापालट केलेला आहे हे अजून तरी कोणालाच समजलेले नाही. खासदार बारणे म्हणजे प्रसिद्धीसाठी हपापलेले राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत. मित्रपक्ष भाजपने देखील बारणे यांचे “फोटोवाला खासदार” म्हणून नामकरण केले आहे. प्रत्येक गोष्टीत प्रसिद्धी मिळवणारे बारणे दत्तक गावाबाबत मात्र गेल्या पाच वर्षात चकार शब्द बोललेले नाहीत. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी बारणे यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा कायापालट जनतेसमोर आणण्याची गरज आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदारांना एक गाव विकासासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपटे हे गाव दत्तक घेतले होते. श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा याच मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बारणे यांनी दत्तक गावात गेल्या पाच वर्षात काय बदल घडवला, हे जाणून घेण्याचा मतदारांचा हक्क आहे. ज्यांना खासदार म्हणून निवडले, त्यांनी संपूर्ण मतदारसंघात काय बदल घडवला यापेक्षा एका गावाचा काय कायापालट केला आहे, हे मतदारांना माहिती होणे गरजेचे आहे.

बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार ते १०२ कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. ही संपत्ती ऐकून मतदारांच्या तोंडात बोट गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे १०० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या खासदाराने दत्तक गावाचा त्याच श्रीमंतीने विकास करणे मतदारांना अपेक्षित आहे. दत्तक गावाचा कायापालट करण्यासाठी बारणे यांनी स्वतःच्या एकूण संपत्तीतील चिमूटभर उत्पन्न जरी खर्च केले असते, तर खोपटे गाव जगाच्या नकाशावर झळकले असते. पण गेल्या पाच वर्षात तसे झालेले नाही, हे वास्तव आहे.

खासदार श्रीरंग बारणे हे प्रसिद्धीसाठी हपापलेले राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत. मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांनी देखील खासदार बारणे यांचे “फोटोवाला खासदार” म्हणून नामकरण केले आहे. जाहीर आरोप-प्रत्यारोपातून हे नामकरण झाले आहे. त्यामुळे बारणे यांनी खोपटे गावाचा कायापालट केला असता, तर त्याची निश्चितच प्रसिद्धी झाली असती. खोपटे गावातील विकास बारणे यांच्या फोटोसह विविध प्रसारमध्यमांमध्ये झळकले असते. परंतु, तसे झालेले नाही. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणणारे खासदार बारणे यांची आता नैतिक जबाबदारी वाढली आहे.

बारणे यांच्यासोबतच शिवसेनेने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. बारणे यांच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करताना दत्तक घेतलेले गाव खोपटेच्या विकासाचा वारंवार मुद्दा उपस्थित होत आहे. बारणे यांनी त्याला प्रत्युत्तर देताना खोपटे गावाचा विकास केल्याचा दावा केला आहे. खोपटे गावातील नागरिक मात्र बारणे हे पाच वर्षात गावाकडे फिरकलेच नाहीत, असे सांगत आहेत. तसेच खोपटे गावाचा काहीही कायापालट झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार बारणे यांनी खरे काय आणि खोटे काय हे सिद्ध करण्यासाठी खोपटे गावाचा केलेला कायापालट पुराव्यासह जनतेसमोर आणण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.