Pimpri

माळवाडी येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By PCB Author

October 16, 2020

देहूरोड, दि. १६ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील माळवाडी गावात असलेले अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला. मात्र त्याला मशीनचा दरवाजा उचकटता न आल्याने त्याचा प्रयत्न फसला. ही घटना गुरुवारी (दि. 15) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली.

नवनाथ उत्तम कणसे (वय 37, रा. दिघी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 15) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवाडी येथे संतोष आल्हाट यांच्या जागेत अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास एक 25 ते 30 वयाचा चोरटा एटीएम सेंटरमध्ये आला. त्याने एटीएमचे फ्रंट डोअर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फ्रंट डोअर उचकटता आले नाही. त्यामुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.