Desh

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय लोकसभेची निवडणूक लढवणार

By PCB Author

September 05, 2018

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – मालेगाव येथे २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय २०१९ची लोकसभा निवडणूक हिंदू महासभेच्या तिकीटावर  पश्चिम बंगालमधील जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहेत. उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारा मेजर रमेश उपाध्याय हा पाचवा आरोपी आहे.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. दुचाकीत बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात ६ जण ठार झाले होते. तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगितले होते. तर कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवरील मोक्का हटवण्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणात सुमारे ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. पुरोहित आणि उपाध्याय यांच्यातील दुरध्वनीवरील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती लागले होते.