मालेगावात ऑनर किलिंग; आई-वडिलांनी आणि भावाने मिळून केला १७ वर्षीय तरुणीचा खून

0
1272

मालेगाव, दि. ४ (पीसीबी) –  मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशयावरुन तसेच समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे जन्मदात्या आईने जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, वडिलांनी हातपाय दाबून ठेवले, तर निर्दयी चुलत भावाने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव येथील कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी कॉलनीत घडली. पोलिसांना निनावी फोन आल्यामुळे सरणावरील मृतदेह थेट शवागृहात हलवला गेल्याने ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला.

नेहाचा शरद  चौधरी (वय १७, रा. मालेगाव) असे हत्या झालेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वडील शरद सखाराम चौधरी, आई सुनीता शरद चौधरी आणि चुलत भाऊ नीलेश मधुकर चौधरी या तिघांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा चौधरी या १७ वर्षीय आल्पवयीन तरुणीचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा काढून श्रीरामनगर अमरधाममध्ये पार्थिव आणले. पार्थिव सरणावर ठेवून अग्निडाग देण्याची तयारी सुरू असतानाच छावणी व कॅम्प पोलिस स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी संशयास्पद मृत्यूचा निनावी फोन आल्याची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवावा लागेल, असे सांगितले. मात्र, नातेवाइकांनी यास विरोध करत फोन करणाऱ्याला समोर आणा, असा पवित्रा घेतला. यामुळे, काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासात आई, वडील व चुलत भाऊ यांनी दिलेल्या मृत्यूच्या कारणात एकवाक्यता नसल्याने पोलिसांचा संशय अधिकच वाढला. अखेर पुरावे समोर येऊ लागल्याने आई-वडिलांचे अवसान गळाले व त्यांनी मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने तिला संपवल्याची कबुली दिली.