मार्शल ड्युटीवरील पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा; पाच जणांना अटक

0
354

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शगुन चौकात रहदारीला अडथळा येत असल्याने मार्शल ड्युटीवरील पोलिसांनी एका पथारी व्यावसायिकाला पथारी लावण्यास मनाई केली. त्यावरून पथारी वाल्याने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी शगुन चौक, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

राजेश मिरचूमल मायारमानी (वय 60), रेणू राजेश मायारमानी (वय 25), महंमद तबारक रैन (वय 18), मोहम्मद जुनैन शेख (वय 27, चौघे रा. पिंपरी), आस्मा हुसैन शेख (वय 24, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक हे बुधवारी सकाळी मार्शल ड्युटीवर होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते शगुन चौक, पिंपरी येथे आले असता आरोपींनी रहदारीस अडथळा येईल अशा पद्धतीने पथारी लावली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पथारी लावण्यास मनाई केली. त्यावरून आरोपींनी पोलीस नाईक सिद्राम यांना अरेरावी करून पथारी काढण्यास नकार दिला. त्यांनतर बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच साथीच्या रोग नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.