मायेचा आधार हरपला! अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचं निधन

0
490

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली.

‘ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती’, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईसाठी चाहत्यांना दुवा करा, असं म्हटलं होतं. माझ्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं अक्षय कुमारने आईच्या आजारपणादरम्यान म्हटलं होतं.