मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही; रामदास आठवलेंचा भाजपला इशारा    

0
1136

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) –  भाजपसोबत असलो, तरीही बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.मायावती या समाजातील खंबीर नेत्या आणि प्रशासक आहेत. माझ्या पक्षातील कोणीही त्यांच्याविषयी असे विधान केले असते, तर मी नक्कीच कारवाई केली असती, असेही आठवले म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील भाजपच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. या  टीकेचे पडसाद  राजकीय वर्तुळात उमटले असून आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मायावती ना पुरुष आहेत ना महिला आहेत, त्या तृतीय पंथीयांपेक्षा वाईट आहेत, त्या महिला जातीला कलंक आहेत, असे वादग्रस्त विधान साधना सिंह यांनी केले. या टीकेची राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.  त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.