Desh

मायवतींचा धक्कादायक निर्णय – उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ

By PCB Author

January 11, 2022

लखनऊ, दि. ११ (पीसीबी) : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारण अधिकच तापू लागलं आहे. एकीकडे योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी थेट राजीनामा देत आज समाजवादी पक्षात प्रवेश केला असताना दुसरीकडे बसपाच्या सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबतही अत्यंत महत्त्वाची बातमी हाती आली आहे. मायावती यावेळी निवडणूक लढणार की नाहीत, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर आज मिळाले आहे. बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षपातळीवर झालेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यात त्यांनी पक्षप्रमुख मायावती यावेळी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. तसा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. मायावती स्वत: निवडणूक लढणार नसल्या तरी बसपाच्या विजयाच्या निर्धाराने त्या प्रचारात उतरतील, असे मिश्रा यांनी सांगितले. माझ्यासह माझी पत्नी कल्पना मिश्रा, माझा मुलगा कपिल मिश्रा तसेच मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद या सर्वांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात यावेळी मायावती यांच्या पक्षाचा दारूण पराभव होईल, असे अंदाज जनमत चाचण्यांमधून बांधले गेले आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता मिश्रा यांनी हे दावे निरर्थक असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात भाजप किंवा समाजवादी पक्ष नाही तर यावेळी बसपाची सत्ता येणार आहे, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाने ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्याची मिश्रा यांनी खिल्ली उडवली. ज्यांना ४०० उमेदवार मिळू शकत नाहीत ते ४०० जागा कशा जिंकणार, असा सवाल मिश्रा यांनी केला.