खूशखबर; केरळमध्ये मान्सून दाखल

0
366

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ज्याच्या आगमनाकडे  सर्वांच्या नजरा लागलेला  मान्सून अखेर आज (शनिवार) मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे.  गेल्या दोन तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकूल वातावरण तयार झाले होते.   आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, अशी अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे.

मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. वाढत्या उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले होते. दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण  झाली आहे. यामुळे सगळ्यांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या होत्या. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

१ जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभराने आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला.  मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन लांबल्याने महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.  मुंबईत   १३ जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, आज  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.  तर रविवारी (दि.९)  विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. १० जून आणि ११ जूनला  विदर्भात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.