Maharashtra

माधुरी दीक्षित लोकसभा लढणार नाही, प्रवक्त्यांनी वृत्त फेटाळले

By PCB Author

December 08, 2018

मुंबई, दि.८ (पीसीबी) – बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचे प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चाही चांगलीच रंगली होती. दरम्यान माधुरीने मात्र स्वत: यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.