माधुरी दिक्षित, अक्षयकुमार, वीरेंद्र सेहवाग भाजपकडून लोकसभा लढवणार?  

0
1000

नवी दिल्ली , दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अभिनेत्री  माधुरी दीक्षित, अभिनेता अक्षयकुमार, भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग व कपिल देव  यांना उतरवण्याचा भाजपचा विचार आहे. या ‘स्टार’ प्रचारकांच्या  वलयाचा फायदा घेत शहरी मतदारांना आकृष्ट करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. 

माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, बप्पी लहरी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कपिल देव, माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग अशा  जनमानसावर प्रभाव टाकू शकणाऱ्या सेलिब्रिटींना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या पर्यायाची सध्या भाजपमध्ये चाचपणी सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेता भाजपच्या वतीने या अभिनेत्यांशी संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिल्ली, मुंबई, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात २०१४ मध्ये मिळवलेल्या विजयाची यंदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता धूसर आहे.  दिल्लीत भाजपने गेल्यावेळी सातही जागा जिंकल्या होत्या; पण आता त्या कायम राखणे अवघड जाणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर आणि अक्षयकुमार यांना दिल्लीत, तर सेहवाग आणि कपिल देव यांना हरयाणातून उमेदवारी मिळू शकते, असे समजते.  हेमामालिनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबूल सुप्रियो, व्ही. के. सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. तर  यावेळी काहींचे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता  आहे.