“मातांचे कुषोषण रोखण्यासाठी उपाययोजना करा” : प्रा. सोनाली गव्हाणे

0
232

– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये कुपोषित मातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून, महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा तथा प्रा. सोनाली गव्हाणे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात २०१९-२० मध्ये १४३ बालमृत्यू झाले होते. मात्र, हा आकडा २०२०-२१ मध्ये ४१२ वर पोहोचला आहे. यावरून शहरात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. शहरात ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे सव्वातीन लाख आहे. मात्र, प्रशासनाकडून बालमृत्यूचे नियंत्रणात प्रमाण आल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात तसे दिसत नाही.

२०१९-२० मध्ये १४३ बालकांचा मृत्यू झाला. हाच आकडा २०२०-२१ मध्ये तब्बल ४१२ वर पोहोचला आहे. बालमृत्यूचे हे प्रमाण प्रती एक हजार जन्मामागे १७.१ एवढे आहे. कोरोना काळामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, अंगणवाड्यातील रिक्त पदे आणि माता व बालकांमधील कुपोषणामुळे मुलांमध्ये वजन कमी असण्याचे तसेच पुढील टप्प्यात मृत्यू ओढावण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे दिसून येतात. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवण्याची वेळ येते. कोरोना संकटामुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले, असेही प्रा. गव्हाणे यांनी म्हटले आहे.

नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे बालमृत्यूंची आकडेवारी (महापालिका पर्यावरण अहवालानुसार) महापालिकेची शहरात १० रुग्णालये आहेत. त्यामध्ये ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयाचा समावेश आहे. याशिवाय आठ प्रसूतीगृह २८ दवाखाने आणि झोपडपट्ट्यांमध्ये २० आरोग्य केंद्रे आहेत. आठ कुटुंब नियोजन केंद्र तसेच ३८ लसीकरण केंद्र आहेत. त्यामार्फत शहरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते.

बालमृत्यू आणि कुपोषण रोखायचे असेल तर मातेचे कुपोषण रोखले पाहिजे, झोपडपट्टीतील मोलमजुरी करणाच्या गरोदर स्त्रियांना अर्धपोटीखाऊन कामावर जावे लागते. पुरेशा अन्नाचा अभाव, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपचार व मार्गदर्शनाला वंचित असणाऱ्या स्त्रिया कुपोषणाच्या बळी ठरतात. गरोदरपणात घ्यायची काळजी व बालसंगोपन याबाबत महिलांना मिळणारे मार्गदर्शन अपुरे आहे. बालमृत्यू टाळण्यासाठी महिला व बालकांना पोषक आहार, वैद्यकीय सहाय्य आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करताना पिंपरी-चिंचवडमध्ये बालमृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.