Desh

माणुसकीला काळीमा: शाळेची फीस न भरल्याने चिमुरड्या मुलींना बसवले बेसमेंटमध्ये

By PCB Author

July 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राजधानीतील राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलने सोमवारी फीस भरली नाही म्हणून ५ ते ८ वर्षे वयोगटातील ५९ मुलींना बेसमेंटमध्ये चक्क पाच तास बंद ठेवले. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता जेव्हा पालक मुलांना घेण्यासाठी राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये पोहचले तेव्हा त्यांना कळाले की एकूण ५९ मुली वर्गातच नव्हत्या. शिक्षकांना विचारल्यावर कळले की, फीस न भरल्याने मुलींची हजेरी लावण्यात आली नाही. त्यांना बेसमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. शाळेच्या हेड मिस्ट्रेस फराह दिबा खान यांच्या सांगण्यावरून असे करण्यात आले. पालकांच्या मते, सर्व मुली बेसमेंटमध्ये जमिनीवर बसलेल्या आढळल्या. तेथे पंखासुद्धा नव्हता. सर्व जणी गरमी आणि तहान-भुकेने व्याकूळ झाल्या होत्या. पालकांनी जेव्हा एच. एम. फराह खान यांना तक्रार केली, तेव्हा त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. खान म्हणाल्या, फीस जमा न करणाऱ्या मुलांना येथे ठेवण्यात आले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, आम्ही सप्टेंबरपर्यंत फीस जमा केली होती. एका चिमुरडीच्या आईवडिलांनी मीडियाला चेकही दाखवला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.