Pune

‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री

By PCB Author

August 12, 2018

पुणे, दि. १२ (पीसीबी) – ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची अशी घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची कामे करण्याची अपेक्षा होती. मात्र, गावागावात इतके गट-तट, धर्म-जात यामुळे ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ त्याचे असे झाले. गावातील या कुरघोड्यांमुळे गावाचा विकास रखडला असून    लोकचळवळीशिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. परंतु गावागावांतील गट-तट, जात-पात आणि पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहत नाही. हीच गोष्ट पानी फाऊंडेशनने हेरून आणि त्यावर काम सुरू केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) पानी फौडेंशनच्या कामाच्या कौतुक केले.     

पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,  महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचे सैन्य होते. त्यांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केले. गावातील लहान असलेल्या माणसांनी मोठे काम करून परिवर्तन केले आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिले आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेले. पूर्वी जलसंधारण म्हणजे नदी नाले केवळ खोल केले जायचे. परंतु पानी फाऊंडेशनने शास्त्रीय पद्धतीने हे काम केले. वॉटर कप मध्ये आम्ही राजकारण आणनार नाही, पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खानला केली.