माढ्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक – प्रभाकर देशमुख  

0
865

पंढपूर, दि. १४ (पीसीबी) – माजी महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मतदारसंघातून सध्या विजयसिंह मोहिते-पाटील प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या मतदारसंघातून उमेदवार देताना डोकेदुखी होणार आहे. तर संभाव्य उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.     

देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यासमोर मी माढ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मला खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना विरोध करायचा नाही. मला पवार यांनी देशपातळीवर काम करण्याची संधी दिल्यास प्रशासनातील कामाच्या अनुभवावर चांगल्या पध्दतीने काम करून दाखवेन. मी गेल्या एक वर्षापासून माढा मतदारसंघात काम करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, माझा कोणालाही विरोध नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. काही काळ त्यांनी पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम केले आहे. देशमुख यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात पवारांनीच त्यांना आता समाजकारण आणि राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. देशमुख हे माण तालुक्यातील असून नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षे त्यांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा जवळून संबंध आला आहे. उमेदवारीची मागणी केल्यानंतर देशमुख यांनी नुकताच पंढरपूर, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला  भागात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.