शरद पवारांची माढा मतदारसंघातून माघार; पार्थ पवार मावळमधून लढणार

0
780

पुणे, दि. ११ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.  राष्ट्रवादीच्या आमदारांची  बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे झाली. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकार परिषदेत हा  निर्णय जाहीर केला. 

पवार म्हणाले की, निवडणूक न लढवण्याबाबत कुटुंबातही मी चर्चा केली. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे, असा माझा मानस आहे.  त्यामुळे पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील.  एकाच कुटुंबातील किती लोकांनी  निवडणूक लढवावी, याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पवारांनी सांगितले.

मी कोणत्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही. आत्तापर्यंत मी चौदावेळा निवडणूक लढवली आहे.पण एकदाही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरे जाण्यास मला आवडले असते.  माढा मतदारसंघातून  उमेदवारीबाबत काही सूचना माझ्याकडे आल्या आहेत. यावर कुणाचे नाव नक्की करायचे हा निर्णय घेतला जाईल,  असेही  पवार यांनी यावेळी सांगितले.