Maharashtra

माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला, तरी मला चिंता नाही; पवारांचा मोदींना पुन्हा टोला

By PCB Author

April 16, 2019

जालना, दि. १६ (पीसीबी) – माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला, तरी मला काही चिंता नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतपप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबावर जोरदार घणाघात केला होता. पवार कुटुंबात कलह सुरू असून पुतण्या पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकास्त्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत सोडले होते. यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे,  की माझ्या पोरीचे लग्न झाले आहे, मला कसली चिंता नाही. माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला तरी चिंता मला नाही.  तसेच माझ्या घराची उठाठेव तुम्हाला कशाला करता?  अशीही विचारणार  करणार आहे, असे पवार म्हणाले.

आमच्या घरात मुलगी आहे, बायको आहे, इतर नातेवाईक येत असतात. मात्र,  मोदींच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे मोदींना घर चालवायचे माहीत नाही. मग ते दुसऱ्याच्या घरात डोकावतात. त्यांना मी सांगणार आहे की हे वागणे बरे नव्हे मोदीजी,  अशा शब्दांत  पवारांनी मोदींना टोला  लगावला आहे.