माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल, तर मी तयार आहे – मुख्यमंत्री

0
429

सोलापूर, दि. २२ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात उच्च नायालय निर्णय घेऊ शकते. मात्र, काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचे काम सुरू आहे. माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आषाढी वारीची परंपरा ८०० वर्षांपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला या वारीला संरक्षण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी पूजा करण्याची परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र, काही संघटनांनी याला विरोध करणे चुकीचे आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. मात्र,  वारकऱ्यांच्या जीवाला धोका नको, म्हणून मी  पंढरपुरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या पंढरपुरात १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे शासकीय पूजेला जाणार नाही. घरी ही विठ्ठलाची पूजा करेन. वाकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील मेगा भरतीमध्ये मराठा तरुणांना ओपनमधून भरती असूनही १६ टक्के पदे राखीव ठेवली जाणार आहेत. आम्ही मराठा तरुणांचे नुकसान करणार नाही, असेही  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.