Maharashtra

माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास जीवनच संपवून टाकीन – धनंजय मुंडे

By PCB Author

October 20, 2019

बीड, दि. २० (पीसीबी) –  पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केल्याचे सिद्ध  झाल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा  आरोपही त्यांनी केला आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका  केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात  शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

मुंडे म्हणाले की,  राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला येऊन असले विधान करणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मागे जो कुणी असेल त्याला शोधून काढण्यासाठी आता आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार  आहे.