Maharashtra

माझ्यामागे लागलेला शनी माहीत आहे; एकनाथ खडसेंचा सुचक इशारा

By PCB Author

January 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझेही चुकले असेल. मात्र, माझ्यामागे शनीची साडेसाती लागली असून शनी कोण आहे, याबद्दल माहिती आहे,  असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमधील आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना निशाणा साधला आहे.    

मधील काही काळात मी अनुभवले, त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे. मात्र, अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट  आला आहे. त्यामुळेच मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. तर  विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलेले नाही. सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आली आहेत, असे खंतही खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.

ज्या व्यक्तीने ४० वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केले. त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते. जो मनस्ताप मला सहन करावा लागला ती म्हणजे शनीची साडेसाती असल्याचे मला वाटते. तो शनी कोण आहे हे देखील मला माहित आहे, असा सूचक  इशाराही त्यांनी आपल्या विरोधकांना दिला.